वारजे : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या तीन प्रभागांच्या ७ जागांवर विजय मिळवीत या प्रभाग समितीवर भाजपचाच बोलबाला राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्र. ३१ ब मध्ये अत्यंत चुरशीच्या निकालात राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी भाजपच्या रोहिणी भोसले यांचा ५८१ मतांनी पराभव केला. त्या या प्रभागात निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविका आहेत.वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीनही १३, ३१ व ३२ क्रमांकाच्या प्रभागात निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रिया रेंगाळल्याने पुण्यात याच क्षेत्रीय कार्यालयाचा निकाल हाती येण्यास उशीर लागला. पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत ही प्रक्रिया सकाळी दहा वाजता सुरू झाली. यातील पहिल्या प्रभाग क्र. १३ हॅपी कॉलनी एरंडवणाचा निकाल साडेबारा-एकच्या सुमारास येणे अपेक्षित असताना त्यास जाहीर करताना धीम्या गतीमुळे दुपारी साडेतीन वाजले होते. त्यानंतर मात्र प्रभाग ३१ व ३२ च्या मतमोजणीने वेग घेतला. पण तरीही अंतिम निकाल हाती येण्यास रात्रीचे १० वाजले होते. प्रभाग १३ मध्ये भाजपाच्या पूर्ण पॅनलने निर्विवाद बहुमत मिळवले. प्रभागात भाजपाच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, दीपक पोटे, मंजूश्री खर्डेकर, जयंत भावे यांनी आपापल्या गटात विजय मिळवले. या ठिकाणी सर्वच उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. ती त्यांनी सहाव्या व अंतिम फेरीपर्यंत वाढवतच नेली.प्रभाग ३१ मध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. या ठिकाणीही भाजपाच्या पॅनलने आघाडी घेतलीच होती. मात्र ब गटात राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने व भाजपाच्या उमेदवार रोहिणी भोसले यांच्यात काँटे की टक्कर झाली. या ठिकाणी पहिल्या व चौथ्या फेरीत भोसले यांनी तर दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या व सहाव्या फेरीत दुधाने यांनी आघाडी घेतली. अंतिमत: दुधाने या ५८१ मतांनी विजयी झाल्या. या गटात भाजपचे नगरसेवक राजा बराटे, वृषाली चौधरी व सुशील मेंगडे विजयी झाले आहेत. प्रभाग ३२ वारजेमध्ये राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलनेच विजय मिळवत या भागात आपलाच बोलबाला असल्याचे दाखवून दिले. या ठिकाणी दिलीप बराटे चौथ्या वेळेस, तर नगरसेवक सचिन दोडके दुसऱ्यांदा, माजी नगरसेविका दीपाली धुमाळ याही दुसऱ्यांदा पालिकेत गेल्या आहेत. स्व. आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे या पॅनलमधून विजय मिळवत, पालिकेतील सर्वांत कमी वयाच्या (वय २३) नगरसेविका ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)
वारजे-कर्वेनगरात कमळाचाच बोलबाला
By admin | Published: February 24, 2017 3:36 AM