प्रशांत देसाई भंडारा‘सद रक्षणाय्, खल निग्रहणाय्’ असे ब्रिद वाक्य असलेल्या पोलीस दलाच्या भंडारा जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांसह महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. तर अनेक पदे प्रभारी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १२ लाख लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या पदाचा प्रभार अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याकडे आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्या आसपास आहे. सहा महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून दिलीप झळके हे रुजू झाले होते. मात्र जिल्ह्यात एका वादग्रस्त प्रकरणानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे अगोदरच अनेक महत्वाची पदे रिक्त असताना त्यात पोलीस अधीक्षकांच्या बदलीने आणखी एका प्रमुख अधिकाऱ्याचे पद रिक्त झाले आहे. जिल्ह्यात भंडारा, तुमसर, साकोली व पवनी असे चार पोलीस उपविभाग आहेत. या चारही ठिकाणची उपअधीक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर या एकमेव प्रमुख अधिकारी म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाची धुरा सांभाळत आहेत. भंडारा जिल्ह्यात १७ पोलीस ठाणे, ११ पोलीस दूरक्षेत्र तर दोन पोलीस चौकी आहेत. भंडारा, तुमसर, साकोली, पवनी असे चार पोलीस उपविभाग आहेत. यापैकी तुमसर वगळता साकोली, पवनी व भंडारा येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. साकोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांची बदली झाल्यामुळे रिक्त जागेवर अद्याप नवीन अधिकारी रूजू झाले नाहीत. पवनी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे, भंडारा येथील उपविभागीय अधिकारी मारुती शेंडे व पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रताप धरमसी हे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे साकोली, पवनी, भंडारा येथील उपविभागीय अधिकारी व पोलीस उपअधीक्षक (गृह) ही महत्त्वाची चार पदे रिक्त झाली आहेत. साकोली, पवनी, भंडारा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांची पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाल्यामुळे या तिन्ही ठिकाणचा प्रभार तुमसर येथील उपविभागीय अधिकारी पी.एन. बुरडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तीन उपविभागाची सुरक्षा सांभाळताना बुरडे यांची दमछाक होत आहे. चार महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाच जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक तांत्रिक, पोलीस उपनिरीक्षक अशी महत्त्वाची सुमारे ४२ पदे रिक्त आहेत. याशिवाय कनिष्ठ दर्जाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी जिल्ह्यातून काही पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पुरेशा पोलिसांअभावी पोलीस प्रशासनाची त्रेधा तिरपीट उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारकरी परतीच्या मार्गावर
By admin | Published: December 11, 2015 12:52 AM