लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आजवर वारकऱ्यांचे कीर्तन शैलीतील चौकार-षटकार सर्वांनी पाहिले असतील, पण क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूच्या भूमिकेत प्रथमच वारकरी अवतरणार आहेत. येत्या ८ व ९ मे रोजी साळुंब्रे (ता. मावळ) येथे वारकरी संप्रदायात प्रथमच ‘वारकरी प्रीमियम क्रिकेट लीग’ खेळली जाणार आहे.
वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे काम करत असतो. त्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण करण्याच्या हेतूने ‘वारकरी प्रीमियर क्रिकेट लीग’ स्पर्धा घेत असल्याचे आयोजक प्रमोद रणनवरे यांनी मंगळवारी (दि. ६) पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी ह. भ. प. पांडुरंग शितोळे, दिलीप राक्षे आदी उपस्थित होते.
या वारकऱ्यांच्या क्रिकेट लीगमध्ये एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. यात सिंहगड सुभेदार, राजगड लायन्स, तोरणा सम्राट, किंग्ज इलेव्हन सज्जनगड, पन्हाळगड योध्दा, अजिंक्य जंजिरा फायटर्स, पुरंदर वॉरियर्स, शिवनेरी टायगर्स, प्रतापगड योध्दा आणि लोहगड मावळ हे संघ असतील.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक आणि वारकरी अशा एकूण दीडशे वारकऱ्यांचा खेळाडू म्हणून सहभाग असणार आहे. स्पर्धेसाठी पाच लाखांची पारितोषिके असणार आहेत. दरम्यान, कोरोनाच्या लाटेमुळे ३० एप्रिलपर्यंत शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. मे महिन्यात कोरोनाची हीच स्थिती कायम राहिल्यास स्पर्धा पुढे ढकलली जाईल, असे आयोजकांनी सांगितले.