पुणे : मोबाइलच्या पडद्यावर अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशांच्या नावावरून फोन आल्यास मनात एकीकडे कुतूहलाची भावना असली तरी दुसऱ्या बाजुला या कुतूहलाची मोठी किंमत अनेकांना चुकवावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाइलवर आफ्रिका, अमेरिका याबरोबरच काही आखाती देशांमधून मोबाइलवर फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. यात विशेष बाब म्हणजे चक्क लँडलाइनवरदेखील अशा प्रकारचे फोन आल्याने नागरिकांनी विशेषत: मोबाइलवर आलेल्या फोनला उत्तर न देणे शहाणपणाचे ठरणार आहे.
कझाकिस्तान, टांझानिया, येमेन, थायलंड, अमेरिका इतकेच नव्हे तर पाकिस्तानमधून मोबाइलवर फोन येण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या मनात शंकेचे वातावरण तयार झाले आहे. मोबाइलवर ‘ट्रु कॉलर’ हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला येणाºया फोनची माहिती कळते. मात्र आता बाजारात हॅकिंगच्या अद्यावत सॉफ्टवेअरमुळे हॅकर्सचे काम सोपे झाले आहे. मोबाइलधारकाने मोबाइलवर ट्रु कॉलर डाऊनलोड केल्यानंतर आपल्याबद्दलची माहिती ईमेलद्वारे आपल्याला पाठविली जाते. मेलवर रोज शेकडोच्या संख्येने ‘स्पॅम’च्या नावाखाली फसविणारे मेल येतात. या मेलला उत्तर दिल्यानंतर फोन येणे, किंवा मेलद्वारेच चॅटिंग करून फसवणूक केली जाते. अनेकजण आपल्याला परदेशातून फोन येतो आहे, या उत्साहातून तो फोन घेऊन आपल्याबद्दलची सर्व माहिती फोन करणाºया व्यक्तीला दिल्याने त्यांना हजारो, लाखोंच्या फसवणुकीला सामोरे जावे लागत असल्याच्या कित्येक घटना सायबर विभागाकडे दाखल होत आहेत.याविषयी अधिक माहिती देताना आयटीक्षेत्रात काम करणारे व सायबर अभ्यासक अनुप कवठाई यांनी सांगितले की, किमान सात ते आठ वर्षांपासून नायजेरिया देशांतून मोठ्या प्रमाणावर कॉल येत होते. या देशांमधील काही हॅकर्स इतर देशांमधील लोकांना फोन करून त्यांची फसवणूक करत असे. आता तर अॅन्ड्रॉइड फोनमुळे हॅकिंग करणे सोपे झाले आहे. ही सिस्टीम सहजासहजी ब्रेक करता येते. यावर उपलब्ध असलेल्या शेकडो अॅपकरिता मेल आयडीचा अॅक्सेस घेतला जातो. वाढत्या आणि बदलत्या टेक्नॉलॉजिमुळे जगातून कुठेही, कुणाला फोन करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आपल्याला नायजेरिया किंवा तझाकिस्तानमधून फोन येतो आहे, असे ट्रु कॉलरच्या मदतीने समजले तरी प्रत्यक्षातून कॉल भारतातील एखाद्या राज्यातून केला गेलेला आहे, याची माहिती आपल्याकडे नसते. मात्र कुठल्याही स्वरूपात या कॉलला उत्तर देता कामा नये. उत्तर देण्याच्या निमित्ताने फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले दिसून येते.तो फोन घेऊच नका...आपल्याला येणारा फोन हा फसवणुकीचा आहे, असे कळल्यावर त्याला उत्तर न देणे हेच शहाणपणाचे आहे. अनेकदा ज्येष्ठांबरोबर तरुणदेखील फोनवरून देण्यात येणाºया माहितीच्या आमिषाला बळी पडतात. त्यामुळे त्यांची लाखोंची फसवणूक होते. सध्या इंटरनेटच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बनावट सॉफ्टवेअर्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे भारतातून फोन करून तो फोन अमेरिकेतून आल्याचे भासविण्यात येते. मात्र, आपल्या मोबाइलच्या पडद्यावर जर अमेरिकेवरून फोन आला आहे, हे दिसत असतानाही संबंधित व्यक्ती तो फोन का उचलते, हा प्रश्न आहे. सध्या सोशल मीडिया आणि बनावट फोनच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण वाढले असून त्याविषयी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.- जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल