पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने दिला आहे. पीएमपीकडे तब्बल ३८ कोटी रुपयांची थकबाकी असून पुढील आठवडाभरात किमान निम्मी रक्कम देण्याची विनंती कंपनीने केली आहे. कंपनीने सीएनजी पुरवठा बंद केल्यास बससेवा ठप्प होण्याची भीती आहे.पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे १४०० बस सीएनजी इंधनावर धावतात. ‘एमएनजीएल’कडून सुरूवातीपासून या बसला गॅस पुरवठा केला जातो. मात्र, पीएमपीकडून गॅसचे पैसे वेळेवर दिले जात नसल्याचा अनुभव कंपनीला सातत्याने येतो. त्यामुळे कंपनीकडून विनंती पत्र पाठविली जातात. त्यामध्ये पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात येतो. लॉकडाऊन काळात पीएमपी सेवा बंद असल्याने सीएनजीची फारशी गरज भासली नाही. परंतु दि. ३ सप्टेंबरपासून २५ टक्के बस मार्गावर धावू लागल्याने गॅसची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे कंपनीने थकबाकी रक्कम देण्याची मागणी पीएमपीकडे केली आहे.याविषयी माहिती देताना एनएनजीएलचे वाणिज्य व्यवस्थापक संतोष सोनटक्के म्हणाले, मागील दोन-तीन वर्षांत थकलेल्या रकमेवरील व्याजाची रक्कम १९ कोटी रुपये आहे. तसेच नियमित बिल १९ कोटी असे एकुण ३८ कोटी रुपये थकले आहेत. लॉकडाऊन काळात उद्योग, वाहतुक ठप्प असल्याने कंपनीलाही महसुल मिळालेला नाही. तसेच पीएमपी बससेवाही बंद असल्याने आम्ही या काळात मागणी केली नाही. पण आता सेवा सुरू झाल्याने गॅसची मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे किमान थकबाकीचे निम्मे पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यासाठी खासदार गिरीष बापट, दोन्ही महापालिकांचे महापौर व आयुक्त, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्याशीही बोलणे झाले आहे. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. अन्यथा सीएनजी पुरवठा थांबवावा लागेल, असेही सोनटक्के यांनी स्पष्ट केले.-------------------पीएमपीची आर्थिक स्थिती दयनीय असल्याने राजेंद्र जगताप यांनी दोन्ही महापालिकांकडून निधी मिळण्याची मागणी केली आहे. हा निधी न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे वेतन करणे कठीण होणार आहे. सध्या बससेवा सुरू असली तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच आता सीएनजी पुरवठा बंद होण्याची टांगती तलवार आहे.-----------
पीएमपी बसचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा; ३८ कोटींची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:47 PM
कंपनीने सीएनजी पुरवठा बंद केल्यास बससेवा ठप्प होण्याची भीती
ठळक मुद्देबसचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने दिला इशारा