पुणे : ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असतानाच हवामान विभागाने नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात ११ व १२ रोजी वादळी वार्यासह गारपिट होण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी विदर्भातील सर्व जिल्ह्यात १२ ते १४ डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
कोकण, गोव्यात गेल्या २४ तासात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे १३.६ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व कोकण, गोव्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली आहे.
११ डिसेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १२ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १३ व १४ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
.........
धुळे व नाशिक जिल्ह्यात ११ व १२ डिसेंबर रोजी गारपिटीसह वादळ पावसाची शक्यता. नंदूरबार जिल्ह्यात ११ डिसेंबर तर जळगाव जिल्ह्यात १२ डिसेंबर रोजी वादळी वार्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.