पुणे : शाहीन चक्रीवादळ गल्फच्या आखाताच्या दिशेने जात असून, त्याचा परिणाम पश्चिम किनाऱ्यावरून आता ओसरला आहे. त्याच वेळी मान्सूनच्या परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बराच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील अमळनेर, करमाळा, पारोळ, अक्कलकुवा, एरंडोल, साक्री, शिरपूर, तळोदा येथे जोरदार पाऊस झाला होता. विदर्भातील मूल, सावली, चिमूरलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मान्सून या आठवड्यात राजस्थानमधून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
रविवारी दिवसभरात पुणे १९, कोल्हापूर २७, सातारा १ आणि बुलढाणा येथे ६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कोकण, गोव्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
बुधवारी (दि. ६) व गुरुवारी (दि. ७) पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात ४ व ५ ऑक्टोबरला तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आज, सोमवारी तर, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांत उद्या, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
विजा चमकताना घ्या काळजी
पुढील ४ ते ५ दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा. त्यावेळी घराबाहेर पडू नका. त्यात जिवाला धोका असून शकतो. शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपारनंतर सायंकाळी व रात्रीपर्यंत असते.