पुणे : राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि ते देखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रातातील कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असल्याचा अंदाज दिलेला आहे. सध्या मध्यप्रदेशपासून विदर्भ, कर्नाटक, दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात दिवसा उन्हाच्या झळा प्रचंड अहेत. रात्री देखील उष्णता वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने दुचाकीचालक घामेघूम होत आहेत.
पुणे शहरातील किमान तापमानही चांगलेच वाढले आहे. शहरातील ३० पैकी २० हवामान अंदाज स्टेशनवर किमान तापामन हे २० अंशावर नोंदले गेले आहे. तर १० केंद्रांवर २० अंशाच्या खाली तापमान नोंदवले गेले. यावरून पुणे चांगलेच तापू लागले असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात वडगावशेरी येथे २६.४, मगरपट्टा २५.२, कोरेगाव पार्क २३.९, हडपसर २३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगरला १८.९ अंश तापमान होते.
रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. तर कमाल तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नये. - अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ