पुणे : राज्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी कोकण व मराठवाड्यात अतिवृष्टी झाली तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पुणे, पालघर व नाशिक जिल्ह्यात गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी पावसाचा इशारा कमी करण्यात आला आहे. शनिवारनंतर पावसात घट होण्याचा अंदाज आहे.
घाटमाथ्यात अतिवृष्टी
सध्या बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून त्या जवळच्या भागात चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. ती स्थिती दक्षिणेकडे अधिक झुकलेली आहे. तसेच मान्सूनची द्रोणीय स्थितीही त्याच्या सामान्य ठिकाणाच्या दक्षिणेकडे सक्रिय आहे. तसेच कमी दाबाची रेषाही सक्रिय असल्याने सध्या राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. बुधवारी संपलेल्या चोवीस तासांत राज्यातील कोकण, घाटमाथा परिसरात अतिवृष्टी झाली. त्यात घाटमाथ्यातील अंबोणे २८२, दावडी २१४, ताम्हिणी २११, माथेरान २१७, कोयना २०४ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. तर लोणावळा १८८, डोगरवाडी १८७ , वाडा १४८, महाबळेश्वर १४२, गगनबावडा १२०, राधानगरी १०४, भामरागड १६०, तुमसर १४८, किनवट २१०, हिमायतनगर १९५, मदखेड १८०, भोकर १६६, अर्धापूर १४७ मिमी असा पाऊस झाला.
मराठवाड्यात ६९ टक्के जास्त पाऊस
मान्सून देशभर सक्रिय असल्याने पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे. देशात आतापर्यंत सरासरीच्या ११ टक्के पाऊस जास्त झाला आहे. देशाची जुलैची सरासरी २७५.५ मिमी असून प्रत्यक्षात ३०६.६ मिमी पाऊस झाला आहे. तर राज्याची सरासरी ३४०.७ मिमी असताना प्रत्यक्षात ४५९ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा ३५ टक्के जास्त आहे. कोकणात २७, मध्य महाराष्ट्र २९, मराठवाडा ६९, तर विदर्भात ३६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात सरासरी ३१३ मिमी असताना प्रत्यक्षात ४५० मिमी पाऊस झाला आहे. तर पुणे शहरात सरासरी २३१.३ मिमी असताना प्रत्यक्ष पाऊस १३ टक्के जास्त अर्थात २६०.७ मिमी झाला आहे. उर्वरित पंधरवड्यात यात आणखी वाढ होईल, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.