लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विदर्भातील बहुतांशी भाग सध्या उष्णतेची लाट सहन करीत असतानाच हवामान विभागाने येत्या शुक्रवारपासून विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
विदर्भाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. कोकण, गोव्याच्या बऱ्याच भागांत, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेनंतर ९ एप्रिलपासून पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ९ ते ११ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल तसेच हिंगोली, परभणी जिल्ह्यांत १० व ११ एप्रिल आणि बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत ११ एप्रिल रोजी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत ९ ते ११ एप्रिलदरम्यान तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी आणि अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ११ एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे व परिसरात ९ ते ११ एप्रिलदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.