लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रावरील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमाना सरासरीच्या जवळपास होते.
१६ फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोदिंया, नागपूर, भंडारा, यवतमाळ वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
१७ फेब्रुवारी रोजी कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
....
पुण्यात गुरुवारी पावसाची शक्यता
उत्तर मध्य महाराष्ट्रलगत आलेल्या चक्रवातामुळे पुणे शहरात १६ फेब्रुवारीपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते १६ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.