वानवडी: पुण्यात दिवसेंदिवस चोरींच्या घटनात वाढ होऊ लागली आहे. संचारबंदीत अनेकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले. आता कुठंतरी सर्व काही सुरळीत होत असताना पुन्हा चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. सुरुवातीला वाहन पळवून लावण्याचे प्रकार झाले होते. आता तर चोरटयांनी कळस गाठला आहे. वानवडीतील होलेवस्ती येथे रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षाची मागील दोन्ही चाके चोरट्यांनी रविवारी रात्री चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
होलेवस्ती सर्वे नं १४ येथील रहिवासी पोपट कोल्हे यांची स्वतःच्या मालकीची रिक्षा आहे. ते नेहमी त्यांची रिक्षा घराच्या जवळच रस्त्याच्या कडेला उपलब्ध जागेत लावत असतात. रविवारी रात्री रिक्षाची मागील दोन्ही चाके चोरट्यांंनी काढून चोरुन नेली. याबाबत भैरोबानाला पोलीस चौकी मध्ये कोल्हे यांनी चोरीच्या घटनेविषयी माहिती दिली आहे.
मागील वर्षापासून याच जागेवर चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. मागच्या वर्षी याच जागेवर लावलेल्या चारचाकी गाडीची पुढील काच अज्ञातांनी फोडली. नंतर गाडीची बँटरी चोरीला गेली होती. तर मे महिन्यात याच ठिकाणी असलेले मयुर सुपर मार्केट हे किराणा मालाचे दुकान चोरट्यांनी फोडून चोरी केली होती. भैरोबानाला पोलीस चौकी मध्ये दुकान फोडल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप दुकान फोडणाऱ्या चोरट्यांचा तपास लागलेला नसताना ही घटना याच रस्त्यावर त्याच ठिकाणी घडली आहे.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त असून चोरांचा छडा लागेल का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वानवडी पोलिसांकडून होले वस्तीत रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.