लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : येथील कचराप्रश्न चिघळला आहे. स्टेशन परिसरातून निघणारा दररोजचा दोन टन कचरा पूर्वी आंबेगाव पुनर्वसन येथील स्मशान परिसरातील गट क्रमांक ८ मध्ये टाकला जायचा. गेल्या आठवडापासून पुनर्वसन ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या अडवल्या व परत कचरागाड्या या परिसरात आल्यास गाडीच्या काचा फोडल्या जातील, असा इशारा चालकांना दिला.त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट कशी करायची? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा राहीला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत परिसरात कचरा पूर्ण भरुन ओसंडून वाहत असलेली घंटागाडी उभी आहे. तसेच परिसरातील व सोसायटीतील कचरा गेली काही दिवसांपासून घंटागाडीत जमा होत नाही. त्यामुळे घराच्या आसपास, रस्त्यावर, कचराकुंडीमध्ये कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसत आहे. भविष्यात हा प्रश्न कायम राहिल्यास आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. याबाबत सरपंच सारिका भोसले म्हणाल्या, गेल्या ७ वर्षांपासून कचरा या परिसरात टाकला जात आहे. भविष्यात खड्डा खणून या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे विभाजन करून त्यावर प्रक्रीया केली जाईल. तसेच पर्यायी जागा मिळेपर्यंत पुनर्वसन ग्रामस्थांनी सहकार्य करावे. पुनर्वसन ग्रामस्थ तथा शिवसेना जिल्हा नेते महेश पासलकर म्हणाले की, गेल्या ७ वर्षांपासुन ग्रामपंचायतीने आम्हाला कसल्याही सुविधा दिल्या नाहीत. तसेच कचरा टाकण्याची कसलीही प्रशासकीय परवानगी ग्रामपंचायतीकडे नाही. कचरा डेपो परिसरात शाळा व स्मशानभूमी आहे. या कचऱ्यात खाजगी व शासकीय दवाखान्यातील घातक सिरींज व विसर्जित न होणाऱ्या वस्तुंचा सामावेश आहे. यामुळे आमच्या आरोग्यास अपायकारक असणाऱ्या कचऱ्यास आमचा विरोध आहे.गायरान जमीन होऊ शकते कचरा डेपोकेडगाव परिसरातील पद्मावती तळे किंवा शेंडगेवस्ती या परिसरात ४० एकर शासकीय गायरान आहे. सध्या या जमिनीवर अतिक्रमण करून लोक घरे बांधत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रीतसर परवानगी घेऊन या परिसरात कचरा डेपो करावा, अशी मागणी समोर आली आहे.
कचऱ्याच्या गाड्या अडवल्या
By admin | Published: June 03, 2017 1:45 AM