पारवडी : बारामती एमआयडीसी येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या जलवाहिनीतून दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विभागातील कारखान्यात पाणीपुरवठा करण्यासाठी पाच लाख लिटर क्षमता असलेल्या टाकीची उभारणी केली आहे. परंतु औद्योगिक विकास महामंडळाच्या उदासीनतेमुळे वेळोवेळी पाणीगळतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता येथील दररोज होणाऱ्या गळतीबाबत प्रशासन गप्प कसे, असा प्रश्न या परिसरातील कारखानदारांना पडत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांना कार्यालयात जाऊन माहिती विचारली असता, कसली माहिती पाहिजे, आज कार्यालयाला सुट्टी आहे. त्यामुळे नंतर माहिती देतो, असे सांगितले. दुसरीकडे मात्र गेल्या आठवड्यापासून दररोज होणाऱ्या पाणीगळतीकडे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना औद्योगिक विकास महामंडळाच्या कामाबाबत आश्चर्य वाटत आहे.
जलवाहिनीतून लाखो लिटर वाया
By admin | Published: December 28, 2016 4:26 AM