गंगा सॅटेलाईट व भैरोबा मार्ग येथील रस्त्याच्या कडेला पांढऱ्या कोंबड्यांच्या पिसांचा कचरा जास्त प्रमाणात असल्याने आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही पांढरी पिसे हवेमुळे इतरत्र उडून परिसर अस्वच्छ होत आहे. तसेच पिसांव्यतिरिक्त या ठिकाणी वेस्ट प्लॅस्टिक, राडारोडा, वापरलेले शहाळे, कचरा भरलेली पोती, फाटक्या कपड्यांचा कचरा निर्माण झाला आहे.
गंगा सॅटेलाईट, भैरोबा मार्ग तसेच कालव्याशेजारील भाग ही सर्व ठिकाणे महापालिका व कॅन्टोन्मेंट प्रशासन यांच्या हद्दीवर असल्याने नेहमीच या ठिकाणच्या स्वच्छतेविषयी प्रश्न निर्माण होत असतो. प्रशासनातील सफाई कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणांची रोजच्या रोज साफसफाई होत नाही व कचरा वेळच्या वेळी घेऊन जात नाही. त्यामुळे दोन्ही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे.
कालव्याच्या शेजारील रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याशेजारीच फळ, भाजी व इतर विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे संपूर्ण पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता अभियान सुरु झाले आहे मात्र कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून स्वच्छतेकडे सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच वानवडीच्या वेशीवरील कचरा दोन्ही प्रशासनाकडून संयुक्तपणे साफ करण्यात आला होता. परंतु पुन्हा या ठिकाणी कचरा निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा भागात पुन्हा कचरा होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना दोन्ही प्रशासनाकडून राबवल्या पाहिजेत, अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
उमेश शिंदे, माजी स्वीकृत सदस्य, वानवडी
रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कोंबड्यांच्या पिसांची दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिसांचा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच साचलेला इतर कचरापण संबंधित प्रशासनाने वेळीच साफ करावा.