लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाॅकडाऊननंतर देखील जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम आहे. जिल्ह्यात आता रेमडेसिविरनंतर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्यासह राज्यातील सर्व ऑक्सिजन कंपन्या पूर्ण क्षमतेने ऑक्सिजननिर्मिती करूनदेखील मागणीपेक्षा पुरवठा कमीच आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता आपला मोर्चा ऑक्सिजन पुरवठा आणि वितरण याकडे वळविला आहे. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणेच आता प्रत्येक खासगी आणि सरकारी हाॅस्पिटलच्या ऑक्सिजन वापरावर बारीक लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रत्येक कोविड हाॅस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन वापराची पहाणी करणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आणि काळाबाजार सुरू होता. अखेर शासनाने स्वतंत्र आदेश काढून रेमडेसिविर इंजेक्शनाचा पुरवठा करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले. यामुळे खासगी मेडिकल, औषध वितरक यांच्याकडे मिळणारी रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री शंभर टक्के बंद करून थेट हाॅस्पिटलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप सुरू केले. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असला तरी सर्व खासगी हाॅस्पिटलवर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केल्यापासून काही प्रमाणात तुटवडा व काळाबाजार बंद झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.
चौकट
...तर १५-२० टक्के ऑक्सिजन मागणी कमी होईल
आता ऑक्सिजन वापरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक खासगी हाॅस्पिटलच्या ऑक्सिजन वापराचे ऑडिट करणार. किती ऑक्सिजन बेड्स, किती पेशंटला ऑक्सिजनची गरज, गरज नसताना ऑक्सिजन दिला जातोय का, गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजनचा वापर होतो का, हाॅस्पिटलच्या सिस्टममध्ये कुठे काही लिकेज आहेत का? याची बारीक पहाणी केली जाणार आहे. यामुळे किमान १५-२० टक्के ऑक्सिजन लिकेज व मागणी कमी होईल, असा विश्वास विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.