लक्ष्मण मोरे पुणे : लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला असून सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, प्रचार सभा, कोपरा सभांवर भर द्यायला सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे सोशल मिडीयाचा जोरदार वापर प्रचारासाठी सुरु आहे. मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून मुंंबईतल्या त्यांच्या वॉर रुममधून कार्यकर्त्यांवर थेट वॉच’ ठेवला जात आहे. पक्षाने नेमलेल्या बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि मंडल प्रमुखांसाठी मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दररोज केलेल्या पक्षाच्या कामाची माहिती कार्यकर्त्यांना या अँपवर अपलोड करावी लागत आहे. अपलोड केलेल्या या माहितीची खातरजमा करण्यासाठी फडणवीसांच्या मुंबई कार्यालयातून कार्यकर्त्यांना थेट दुरध्वनी करुन विचारणा होत आहे. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया आणि इंटरनेट माध्यमाचा जोरदार वापर केला होता. भाजपाची टेक्निकल टीमही सक्षम असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या निवडणुकीतही पन्ना प्रमुखांपासून केंद्रीय पातळीवरील कार्यकर्त्यांच्या कामाचे नियोजन ठरलेले आहे. पक्षाने पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि मंडल प्रमुख अशी ‘ग्राऊंड लेवल’ वरील कार्यकर्त्यांची वर्गवारी केली आहे. तीन चार बुथ प्रमुखांमागे एक शक्ती प्रमुख नेमण्यात आलेला आहे. तीन चार शक्ती प्रमुखांमागे मंडल प्रमुखाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या मंडल प्रमुखांचे ‘रिपोर्टींग’ स्थानिक आमदारांकडे देण्यात आलेले आहे.पक्षाने या कार्यकर्त्यांसाठी खास मोबाईल अॅप तयार केले आहे. पक्षाच्या आदेशानुसार केलेली कामे, प्रचारविषयक कामे तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्याचे छायाचित्र आणि माहिती या अॅपवर अपलोड करावी लागते. अॅप डाऊनलोड करताना कार्यकर्त्याचे नाव, मोबाईल क्रमांक, जबाबदारी याची सर्व माहिती देण्यात आलेली असल्याने वरिष्ठ पातळीवरुन थेट कार्यकर्त्याशी संपर्क साधणे सोपे होते. सध्या कार्यकर्ते त्यांनी केलेल्या कामांची माहिती मोठ्या प्रमाणावर अपलोड करीत आहेत. माहिती खरी किंवा खोटी याची खातरजमा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन होेत आहे. पुण्यातील बºयाचशा कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे फोन मुंबईतून येत असून त्यांच्याकडे कामाची माहिती विचारली जात आहे.
भाजपा कार्यकर्त्यांवर थेट ‘सीएम’चा आहे ‘वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 1:40 PM
मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून मुंंबईतल्या त्यांच्या वॉर रुममधून कार्यकर्त्यांवर थेट वॉच’ ठेवला जात आहे.
ठळक मुद्देमोबाईल अॅप : अपलोड करावी लागते प्रचार केल्याची माहिती