पुणे : नागरिकांकडून मॉर्निंग वॉकसाठी ज्या ठिकाणांचा सर्वाधिक वापर केला जातो, त्या सर्व ठिकाणांवर आता पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी असणारी ठिकाणे निश्चित करून तेथे गणवेशधारी पोलिसांची तसेच साध्या वेशातील पोलिसांची गस्त घालण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.पुणे शहर पोलीस दलातील सर्व उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक पोलीस आयुक्तांनी बोलावली होती. या बैठकीस पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्यासह उपायुक्त मकरंद रानडे, डॉ. सुधाकर पठारे, मनोज पाटील, श्रीकांत पाठक, एम. बी. तांबडे, राजेंद्र माने, जयंत नाईकनवरे, राजेश बनसोडे उपस्थित होते. पुण्यात २० आॅगस्ट २०१३ रोजी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. त्यानंतर कोल्हापुरात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांचीही सकाळीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, लोकमतने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबतचे वास्तवदर्शी स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यामधून सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. याची दखल घेऊन पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मॉर्निंग वॉकची ठिकाणे निश्चित करून त्या भागात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. गणवेशधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलीसही सकाळच्या सत्रात गस्त घालणार आहेत. गस्तीदरम्यान पोलिसांना संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्या व्यक्तींकडे चौकशीही केली जाईल. विशेषत: सामाजिक कार्यकर्ते राहतात तो भाग पोलिसांच्या ‘स्कॅनर’खाली असेल. यासोबतच पर्वती टेकडी, तळजाई टेकडी, संभाजी उद्यान, पुणे विद्यापीठ, वेताळ टेकडी, हनुमान टेकडीसह मॉर्निंग वॉकची ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांना त्या-त्या भागांमध्ये मार्शल आणि गस्ती पथकांद्वारे गस्त घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या या गस्तीवर संबंधित परिमंडलाच्या उपायुक्तांनी लक्ष ठेवण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
मॉर्निंग वॉकच्या ठिकाणांवर पोलिसांचा राहणार ‘वॉच’
By admin | Published: February 26, 2015 3:23 AM