पिंपरी : निवडणूक आयोगाच्या वतीने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांचे व्हिडीओ निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नागरिकांना अपलोड करण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आचारसंहिता जारी झाल्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नियोजन केले. या संदर्भातील माहिती देताना आयुक्त म्हणाले, ‘‘२१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठीचे नियोजन केले आहे. या संदर्भातील आढावाही घेण्यात आला आहे. बहुसदस्यीय पद्धतीने ही निवडणूक होणार असून ३२ प्रभाग असणार आहेत. तसेच ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्त्ी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार होणार आहेत. यासाठी सुमारे वीस कक्ष कार्यान्वित केले आहेत. नियोजनानुसार १२ जानेवारीला प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली आहे. यावरील हरकतींसाठी १७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रभागनिहाय विभाजन केलेली मतदार यादी २१ जानेवारीला प्रकाशित केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यासाठी ट्रू वोटर अॅप सुरू केले आहे. या अॅपची मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत होणार आहे. तसेच उमेदवारांना शपथपत्राद्वार भरलेली माहिती पाहता येणार आहे. तसेच दैनंदिन खर्चही सादर करता येणार आहेत. शहरातील राजकीय पक्ष उमेदवारांच्या संबंधित फलक, बॅनर काढून टाकण्यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत. या संदर्भात भोसरीतील एक तक्रारही आली होती. त्या संदर्भात शहनिशा करण्याचे काम सुरू आहे.निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी परिमंडळ तीनचे उपायुक्त, तसेच पोलीस ठाण्यांनाही माहिती कळविण्यात आली आहे. पत्रव्यवहार केला आहे. आचारसंहितेसंदर्भात तक्रार आल्यास सुरूवातीला पोलीस आणि भरारी पथकाला कळविण्यात येईल. ’’(प्रतिनिधी)निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. विविध उपाययोजना करण्यात आल्या असून आचारसंहिता कक्षाची स्थापना झाली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने भरारी पथक, चेक पोस्ट पथक, व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक नियुक्त केले जाणार आहे. - दिनेश वाघमारे, आयुक्त
आचारसंहिता उल्लंघनावर व्हिडीओची नजर
By admin | Published: January 13, 2017 3:12 AM