लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : बंगल्यावर वॉचमन म्हणून कामाला असलेल्या वॉचमननेच बंगल्यात प्रवेश करून सोने व चांदीचे दागिने असा ११ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नारायणगाव येथे शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात वॉचमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील सुदाम सहदेव दळवी यांच्या बंगल्यावर वॉचमन म्हणून विक्रम कामी हा मागील ४ महिन्यांपासून कामाला होता. त्याच्यासोबत त्याची बहीण मनीषा, तिचा पती हे देखील तिथेच राहायला होते. शुक्रवारी (दि. २) रोजी सकाळी १० वाजता सुदाम दळवी हे सर्व कुटुंबीयांसोबत साकूर मांडवे येथे लग्नाला गेले होते. लग्नावरून दीड वाजता परत घरी आल्यानंतर घरात गेल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या वॉचमनने टेरेसवरून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील लॅपटॉप, ३० तोळे सोने, चांदीची गणपती, सोन्याची जप माळ असा एकूण ११ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस नाईक दीपक साबळे व पोलीस कॉन्स्टेबल संदीप वारे यांनी भेट दिली. यापूर्वी नारायणगाव येथील डॉ. सोपान गोसावी यांच्याकडे वॉचमन म्हणून कामाला असलेल्या वॉचमननेच मोठी चोरी केल्याची घटना सुमारे ५ महिन्यांपूर्वी घडली होती.