पुणे : “राज्यातच नव्हे तर देशातही पाणी मुबलक प्रमाणात आहे, मात्र त्याचे व्यवस्थापन नाही,” असे मत शुक्रवारी (दि.२६) जलमंथन परिषदेत बहुसंख्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.
फोरम फॉर इंटेलेक्च्यूअल्स व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, सतीश खाडे, भक्ती जाधव ऑनलाइन माध्यमातून तर माजी जलसचिव डॉ. दि. मा. मोरे, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, सुरेश खानापूरकर, डॉ. दत्ता देशकर, अभिजित घोरपडे, रवींद्र धारिया आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.
पाण्याचे व्यवस्थापन नसल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली. समान पद्धतीने वाटप होत नाही. धरणांची दुरूस्तीची कामे होत नाहीत, अशी तक्रार काहींनी केली. धरणांच्या उंचीचा अभ्यास करून धरणे बांधली गेली नाहीत, त्यामुळे कुठे पाणी साचते तर कुठे वाहून जाते, अशीही टीका करण्यात आली.