बारामतीला मिळणारे पाणी फक्त पिण्यासाठीच- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:26 AM2018-12-03T02:26:10+5:302018-12-03T02:26:20+5:30

बारामती तालुक्यातील तलावामध्ये तसेच पाणी योजनांसाठी खडकवासलामधून येणारे पाणी हे फक्त पिण्यासाठी असणार आहे.

Water for Baramati is for drinking only - Ajit Pawar | बारामतीला मिळणारे पाणी फक्त पिण्यासाठीच- अजित पवार

बारामतीला मिळणारे पाणी फक्त पिण्यासाठीच- अजित पवार

Next

बारामती : बारामती तालुक्यातील तलावामध्ये तसेच पाणी योजनांसाठी खडकवासलामधून येणारे पाणी हे फक्त पिण्यासाठी असणार आहे. त्याचा शेतीसाठी कोणीही वापर करू नका. पाण्याचे दुर्भिक्ष भविष्यात जाणवणार आहे. हे नैसर्गिक संकट आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नका. सामंज्यस्याने, सहकार्याने दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी पाणीटंचाई, चाराटंचाई, रोहयो अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या आढावा बैठकीचे कविवर्य मोरोपंत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पवार यांनी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांच्या शासनस्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने उपलब्ध पाण्याचे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याकरिताच प्राधान्य असणार आहे. तालुक्याला पाणीपुरवठा होत असलेल्या जानाई, शिरसाई तसेच पुरंदर उपसा योजना इत्यादींचा आढावा घेण्यात आला. खासदार शरद पवार यांच्या खासदार निधीतून सिमेंट बंधारे बांधण्याकरिता एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यामध्ये आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, रोहयो अंतर्गत करावयाची कामे इत्यादीबाबत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्यक कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
दुष्काळाच्या काळामध्ये उपलब्ध होणाºया पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त पिण्याकरिताच करावयाचा असल्याचे सांगून इतर बाबींकरिता वापर होत असल्यास त्या विहिरींवरील विद्युतपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगितले. मागील वर्षी नियोजन करण्यात आलेल्या ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाची कामे तसेच गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही सांगितले. रोजगार हमी योजनामार्फत करावयाच्या कामांकरिता पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे सांगून शासनाने जाहीर केलेल्या बारामती तालुक्यातील दुष्काळी गावातील १२ हजार विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास पासेस देण्यात आले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच नागरिकांनी उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या समस्यांचे उत्तरे देण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
>जानाई-शिरसाईसाठी पाणी मिळणार : हेमंत निकम
जिरायती भागातील पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासलामधून जानाई योजनेसाठी १५० एमसीएफटी आणि शिरसाई योजनेसाठी १०० एमसीएफटी पाणी देण्यात येणार आहे. खडकवासलाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. या पाण्यातून शिरसाई योजनेवरील ६ तलाव तर जानाई योजनेवरील १३ तलाव भरण्यात येणार आहे. त्यापैखी जानाई योजनेसाठी तलावात ५० एमसीएफटी पाणी आले आहे. १५० एमसीएफटी पाणी तलावात आल्यानंतर हे पाणी सुपे तलावात सोडण्यात येणार आहे. तालुक्यात आतापर्यंत दहा टँकरमार्फत १३० वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, नव्याने मागणी करण्यात आलेल्या गावांना जीपीएस प्रणाली लावून तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पाणीवाटपाचे माहे मे महिन्यापर्यंतचे ६० ते ६५ टँकरचे नियोजन केले आहे. दरम्यान, बारामती शहरामध्ये देखील भविष्यात येणाºया पाणी संकटावर आताच उपायोजना करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. नगरपालिकेने शहरात असणाºया जुन्या, इतिहासकालीन विहिरींची स्वच्छता करून घ्यावी. हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्यास त्याचा वापर करावा. तसेच काही विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्यास त्याचा वापर नगरपालिकेने केलेल्या वृक्षांसाठी करावा. पाणी कोठेही वाया जाणार नाही याची काळजी घ्या, असे सांगितले.

Web Title: Water for Baramati is for drinking only - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.