पुणे : महापालिका अधिकारी व जलसंपदा अशी संयुक्त बैठक झाल्यानंतरही शहराच्या पाण्यासाठी लागणाऱ्या थकीत बिलावर काहीच तोडगा निघू शकला नाही. दोन्ही विभाग आपापल्या म्हणण्यावर ठाम राहिले. आता हा विषय थेट जलसंपदा मंत्र्यांच्या दालनातच सोडवला जाण्याची चिन्हे आहेत.पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून घेत असलेल्या पाण्याच्या बिलापोटी जलसंपदा विभागाने महापालिकेवर ३९५ कोटी रुपयांची थकबाकी काढली आहे. पैसे दिले नाहीत तर २० मार्चनंतर पाणी देणे बंद करण्याचा इशाराही त्यांनी लेखी स्वरूपात महापालिकेला दिला आहे. महापालिकेत शनिवारी जलसंपदा व महापालिका अशी संयुक्त बैठक घेण्यात आली. आयुक्त कुणाल कुमार, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. बी. शेलार आदी उपस्थित होते. जलसंपदाने बिल चुकीचे आहे हे अमान्य केले. शेलार यांनी महापालिका जास्त पाणी घेत आहे याकडे लक्ष वेधले.बिल आकारणीच्या पद्धतीबाबत अनेक शंका आहेत, त्या दूर कराव्यात असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. अखेरीस आयुक्त कुणाल कुमार यांनी मध्यस्थी केली. कालव्यातून टाकण्यात येणाºया जलवाहिन्यांचे जलसंपदाने बंद केलेले काम पुन्हा सुरू करून द्यावे, अशी मागणी केली.जलसंपदाने चुकीच्या पद्धतीने बिल आकारणी केली असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे असेल तर जलसंपदाने त्याचा खुलासा केला पाहिजे. यात नक्की काय झाले आहे, त्याची थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जाऊनच चौकशी करू, असे महापौर मुक्ता टिळक व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
पाणी बिलावर तोडगा नाहीच, जलसंपदा-पालिका वाद, ३९५ कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 3:26 AM