मार्गसनी : पुणे जिल्ह्यासह राज्यभर गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती ओढवली आहे. त्याचवेळी राजगडकडे जाणाऱ्या साखर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असल्याने बारागाव मावळ परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. तर धानेपजवळ असलेला पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे.
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरती असणारे कर्नवडी गावाजवळ असलेल्या डोंगराला मागील वर्षी भेगा पडलेल्या होत्या. त्यामुळे या गावास धोका संभवतो म्हणून या गावास पाहणी करण्यासाठी तहसीलदार शिवाजी शिंदे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार गुप्त विभागाचे प्रमुख अभय बर्गे गेले असता कर्नवडी गावाला जोडणाऱ्या दरीमध्ये जास्त पाणी आल्याने गावांमध्ये जाता आले नाही. परंतु फोनवर संपर्क केल्यानंतर येथील लोक सुरक्षित असल्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वेल्हे तालुक्यात गेली पाच दिवस पावसाने थैमान घातले असून प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील वेल्हे केळद आणि पानशेत घोल मार्ग मोकळा झाला आहे. तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय सपकाळ पोलीस निरीक्षक मनोज पवार आदी अधिकाऱ्यांनी तत्परतेने जाधववाडी येथे कोसळलेली दरड बाजूला केली. तसेच पानशेत - घोल रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.
गुंजवणी धरणातून पाणी सोडल्याने कानंदी नदी दुथडी भरून वाहत आहे. तर राजगडाकडे जाणारा साखर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलेला आहे. केळद वेल्हे रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तर रस्त्याला ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. तरी नागरिकांनी रात्रीच्यावेळी प्रवास करू नये असे आवाहन तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी यावेळी केले आहे.