आंबेगाव खुर्दजवळील शनिनगरपासून केवळ हाकेच्या अंतरावरील नगर म्हणजे हनुमाननगर. पण गेली दोन दशके 'पाण्यासाठी साडेसाती' पाठीमागे लागावी असा त्रास भोगत होते. या गावातील तब्बल चार हजार नागरिक वीस वर्षांपासून नळाच्या पाण्यापासून वंचित होते. खोल पाण्याच्या विहिरीतून पाणी शेंदणे, दिवसभर पाण्यासाठी वणवण फिरणे, पाण्याच्या टॅकरची वाट पाहाणे, पाण्यावरून होणारी भांडणं आणि तंटा ही यांची नित्याची गोष्ट बनली होती. परंतु जनहित विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी धनकवडी सहकारनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी 'हनुमाननगरला नळाने पाणीपुरवठा व्हावा' यासाठी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाणी घरोघरी आले.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात सच्चाईमाता मंदिर, वाघजाईनगर परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून आंबेगाव खुर्दसाठी पाणीपुरवठा केला जात होता. साधारण दोन अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबेगाव खुर्द परिसरात वाघजाईनगरमधील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करण्यासाठी २४ तास वेळ आणि लाखो रुपयांचे वीजबिल, असा मोठा भुर्दंड महापालिकेला सोसावा लागत होता. मात्र, नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्यामुळे बारा इंची पाईपलाईन दरम्यान सबलाईनमधून हनुमाननगर आणि आंबेगाव खुर्द या दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करत महापालिकेच्या लाखो रुपयांची बचत केली. याकामी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव, उपअभियंता कुणाल यादव, मुकादम नंदकुमार पाटील आणि सुपरवायझर कुमार निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
------------------------
(१) हनुमाननगर गावात मी लहानाचा मोठा झालो, पण गावाला काही पाणी आलं नाही. मात्र आज गुढीपाडव्याला गावातील नळाला पाणी आलं. त्यामुळे पाडवा सुखाचा झाला आहे.
- अमित थोपटे, नागरिक (हनुमाननगर)
(२) पहाट झाली की, स्नान, स्वयंपाक सारं काही बाजूला ठेऊन पाण्यासाठी वणवण करायची हाच आमचा रोजचा जीवनक्रम होता. परंतु आज घरच्या नळाला पाणी आलं आणि डोक्यावरचं हंड्यांचं ओझं कायमचं हलकं झालं.
- अर्चना मोहोळ रहिवासी (हनुमाननगर)
(३) आमच्या भागाला पाण्याचा वनवास होता. पण आता हा वनवास संपला आहे. घरोघरी पाणी आल्याने सर्व आनंदात आहेत.
-शालन खोत, रहिवासी (हनुमाननगर)