पुणे : गेली अनेक वर्ष दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फक्त दोनच ठिकाणी आयोजित होणारा महिला गटांचा बचत बजार यंदा महापौर बचत बाजार अशा नावाने शहरात तब्बल ७ ठिकाणी भरला होता. दररोज दुपारी विक्रीच्या वेळेसच कोसळणारा पाऊसही या बचत बाजारातील महिलांच्या उत्साहावर पाणी टाकू शकलेला नाही. गेल्या ५ दिवसात सर्व ठिकाणी मिळून १४ लाख रूपयांची विक्री झाली आहे. आता डिसेंबरपासून याहीपेक्षा जास्त ठिकाणी व प्रत्येक आठवड्याच्या दर शनिवार रविवारी असे बचत बाजार महापालिकेच्या वतीने भरवण्यात येणार आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्याच राणी लक्ष्मीाबाई महिला सक्षमीकरण योजनेतंर्गत एकापेक्षा जास्त ठिकाणी असे बचत बाजार सुरू करण्याची कल्पना मांडली. महापालिकेकडे नोंदणी केलेले एकूण ३९० बचत गट आहेत. त्यांच्याकडून दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ तसेच इथर वेळी शोभेच्या वस्तू, गृहोपयोगी गोष्टींचे उत्पादन होत असते. दोनच ठिकाणी महापालिका बचत बाजार आयोजित करत असल्यामुळे अनेक महिला बचत गटांना त्यात सहभागी होता येत नव्हते. ही अडचण ओळखून महापौरांनी समाज विकास विभागाला एकापेक्षा जास्त ठिकाणी बचत बाजार आयोजित करायला सांगितले.काही दिवसांपुर्वीच महापौर तसेच अन्य पदाधिकार्यांच्या हस्ते या सहा ठिकाणच्या महापौर बचत बाजारांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रोज दुपारी पाऊस कोसळत आहे, मात्र तरीही या सर्व बचत बाजारांमध्ये महिलांना चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त पाच दिवसात त्यांनी सर्व ठिकाणी मिळून १४ लाख रूपयांची विक्री केली आहे. दोन हजारपेक्षा जास्त महिलांचा सहभाग हे या बचत बाजारांचे वैशिष्ट्य आहे. त्यात खाद्यपदार्थांचे एकूण ९० स्टॉल होते. आकाशकंदिल व अन्य साहित्याचे ४२४ स्टॉल होते. महिलाविषयक काम करणार्या काही स्वयंसेवी संस्था, संघटना यांनाही यात सामवून घेण्यात आले होते.अशा बचत बाजारमधील सहभागासाठी, स्टॉल टाकण्यासाठी एरवी खासगी संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारले जाते. अनेक महिला बचत गटांना ते परवडत नाही, त्यामुळे ते तिकडे फिरकत देखील नाहीत. मात्र त्यामुळे उत्पादीत झालेला माल विक्री करण्यात त्यांच्यापुढे अडचणी येतात. महापालिका मात्र या बचत गटांकडून स्टॉलसाठीच काय पण कोणत्याही गोष्टीसाठी शुल्क घेत नाही. त्यांना दिव्यांची व्यवस्थाही विनामुल्यच करून दिली जाते. महापौर बचत बाजारमुळे आम्हाला एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे अशी प्रतिक्रिया बचत बाजारात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी व्यक्त केली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या की अनेक कुटुंबातील अन्य समस्या आपोआपच मिटतात. त्यामुळेच बचत बाजारांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यापुढे प्रत्येक आठवडट्याच्या शनिवार रविवार असे दोन दिवस हे बाजार आयोजित करण्यात येतील. त्याशिवाय महापालिकेच्या माध्यमातून या महिलांना त्यांच्या मालाची विक्री, पॅकिंग, जाहिरात कशी करायची अशा आवश्यक गोष्टींचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.- मुक्ता टिळक, महापौर
महापालिकेच्या समाज विकास विभागाने या संपूर्ण बचत बाजारांचे संयोजन, नियोजन केले. महापौरांनी स्पष्ट सूचना केल्या होत्या, त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली. नवी ठिकाणेही शोधण्यात येत आहेत. महापालिकेचे शहरात अनेक ठिकाणी बंद असलेले गाळे आहेत. ते बचत गटांना महिन्याच्या किंवा पंधरा दिवसांच्या मुदतीने उपलब्ध करून द्यावेत, त्यामुळे या बचत गटांना चांगले बळ मिळेल. प्रशिक्षण देण्याची महापौरांची सूचना आहे, त्याप्रमाणे नियोजन करत आहोत.- संजय रांजणे, मुख्य समाज विकास अधिकारी, महापालिका