आंबेठाण : आजवर कालव्याद्वारे पाण्याचा थेंबही मिळाला नाही. उलट आमच्या जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के टाकून दडपशाही सुरू आहे. एक तर कालव्याने पाणी द्या, नाही तर जमिनीवरील शिक्के काढून सात-बारा कोरा करा, अशी आक्रमक भुमिका कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. याविरोधात लवकरच याचिका दाखल करणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.भामा आसखेड धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी आल्यानंतर वषार्नुवर्षे जिरायती असणारी जमीन बागायती केली जाईल, या आशेपायी अनेकांनी जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के पडण्यास फारसा विरोध केला नाही. परंतु धरणाच्या पाण्याचे वाटपदेखील झाले आहे. त्यातच उजवा कालवा जवळपास रद्द झाल्यातच जमा आहे. त्यामुळे जमिनीस कालव्याद्वारे पाणी मिळणार नाही, पण जमिनीवर शिक्के मात्र पडलेले आहेत. अशा कात्रीत या गावचा शेतकरी सापडला आहे. त्यामुळे आता काहीही झाले तरी जमीन पुनर्वसनासाठी देणारच नाही, असा आक्रमक पवित्रा कोरेगाव खुर्दच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. भामा आसखेड धरणाच्या बुडीत क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी जमीन म्हणून धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या या जमिनी देण्यात आल्या आहेत. या गावातील जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुनर्वसनासाठी जमीन राखीव असल्याचे शिक्के पडले आहेत. पुनर्वसनासाठी जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांपैकी पाच शेतकऱ्यांनी या मिळालेल्या जमिनी अन्य त्रयस्थ लोकांना विकल्या आहेत. त्यामुळे हे शेतकरी ताबा घेण्यास आल्यानंतर त्यांच्यात आणि मूळ व जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांत वादावादी होत आहे. अशा प्रकारे जमिनीचा ताबा घेण्यासाठी शेतकरी आल्यानंतर कोरेगाव ग्रामस्थांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्हाला पाणी न देता आमच्या जमिनीवर ताबा देऊन आमच्यावर अन्याय केला जात असून याविरोधात आम्ही स्थगिती मागणार आहोत, तसेच याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रसंगी बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव, काळुराम कडूसकर, गेनभाऊ कडूसकर, शांताराम कडूसकर, बबन म्हसे, सोपान गाळव, बबन गोगावले, काळुराम गाळव, मारुती गाळव, रामचंद्र गोगावले, राजाराम गोगावले, किसन शेळके, बबन दोंद, शिवनाथ झांबरे, प्रकाश दोंद, मधुकर शेळके, भिवा गाळव, नामदेव झांबरे, संजय झांबरे, किसन गोगावले, उत्तम कडूसकर यांच्यासह शेतकरीबांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(वार्ताहर)माझी जमीन कालव्यासाठी आणि पुनर्वसनासाठी अशा दोन कारणांसाठी संपादित केली आहे. एकाच शेतकऱ्यांची जमीन दोन कारणांसाठी संपादित करून माझ्यावर अन्याय केला आहे. जिवापाड फुलविलेली शेती दुसऱ्याला द्यावी लागली तर जगून उपयोग नाही.काळुराम कडूसकर,शेतकरी, कोरेगाव खुर्दसर्व पीकपाणी नोंदीचा अहवाल हा कोतवालाने जागेवर जाऊन केलेला आहे.डी. डी. कोठावळे, तलाठी
कालव्याने पाणी द्या; नाहीतर जमीनही देणार नाही!
By admin | Published: July 26, 2016 5:17 AM