- दीपक हाेमकर
पुणे : पुण्यातील बहुतांश तलावांची पातळी ६० ते ७० टक्क्यांनी घटली आहे. मस्तानी तलावात तर थेंबभरही पाणी राहिले नाही. खडकवासला धरणातील साठ्यानेही तळ गाठायला सुरुवात केली आहे. एकीकडे इतके विदारक चित्र तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हाळ्यातही टँकर माफियांना पाणी विकणाऱ्यांच्या विहिरी मात्र काठोकाठ भरलेल्या दिसत आहेत. ही ‘जादू’ किंवा हा चमत्कार घडताे कसा, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच जलवाहिनी, कॅनॉलच्या पाण्याची चाेरी हाेत असल्याचा आराेपही काहींनी केला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काहीच वाटत नाही, हीच खरी मेख आहे.
विशेषत: महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी शेजारील आणि खडकवासल्यावरून शहरभर पसरलेल्या कॅनॉल जवळील खासगी शेतातील विहिरीत भरपूर पाणी आहे. टँकर माफियांना पाणी विकणाऱ्या या टँकर पॉइंटच्या विहिरी काठोकाठ भरलेल्या दिसत असून, या खासगी टँकर पॉइंटवरून दररोज शंभरहून अधिक टँकर भरून जात असतानाही पाणी कमी हाेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एका टँकरमध्ये तब्बल दहा हजार लिटर पाणी भरले जाते. त्यानुसार शंभर टँकर भरून गेले तर दिवसात दहा लाख लिटर पाणी त्या विहिरीतून उपसले जाते. अनेक महिन्यांपासून दहा-दहा लाख लिटर पाणी उपसले जात असताना आणि त्याच विहिरींतून शेतीलाही पाणीपुरवठा केला जात असताना विहिरी भरलेल्याच कशा, या विहिरीतील झरे आटले कसे नाहीत, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. याबाबत तक्रार येत नाही तोपर्यंत विहिरीत पाणी कुठे मुरतंय? हे तपासले जात नाही, अशी भूमिका महापालिकेची आहे.
भूमिगत जलवाहिनी तोडली की कॅनॉल फोडला?
एकीकडे पुण्यातील भले मोठे जलस्त्रोत आटत आहेत, तर दुसरीकडे टॅंकर भरणाऱ्या विहिरी काटाेकाट भरलेल्या आहेत. दररोज दहा लाख लिटर पाणी उपसा होत असतानाही या विहिरींची पाणी पातळीवरून कशी निघते? याबाबत परिसरात कुजबुज सुरू आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या आणि कॅनॉलच्या शेजारी असलेल्या विहिरींच्या बाबतीतच हे घडत आहे, त्यामुळे काही विहीर मालकांनी कॅनॉल फोडल्याची, तर काहींनी थेट महापालिकेची जलवाहिनी फोडून विहिरीत अंडर ग्राऊंड पाणी आणले असल्याची चर्चा सुरू आहे.
पुण्यातील सोसाट्यांमध्ये राहणारे बहुतांश नागरिक नोकरदार आहेत. त्यांना घडाळ्याच्या काट्यावर ऑफिससाठी बाहेर पडावं लागतं. सायंकाळी घरी येताना उशीर होतो, त्यामुळे नळाला पाणी नसेल तर सोसायटी टॅंकर बोलावून मोकळी होते. ते पाणी कसे आहे?, कुठून आले? हे पाहणे आणि तपासणे यासाठी वेळच नसतो. त्याचा गैरफायदा प्रशासन घेत आहे. खरंतर २०१७ च्या निवडणुकीत २४ बाय ७ पाणी योजनेची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र, ती घोषणा फुसकी निघाली आणि आज २४ तास नव्हे तर चार तासही पाणी येत नाही. जितक येतं तेही शुद्ध नाही. महापालिकेच्याच टॅंकर पाॅईंटवर प्रक्रिया न केलेले पाणी पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरमध्ये दिवसाढवळ्या भरून दिले जात आहे, त्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू केलेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे तसेच सर्व टॅंकर पाॅईंटवर पाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था केली पाहिजे.
- प्रशांत जगताप, माजी नगरसेवक
वास्तविक गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या भागातील अनेक सोसायट्या टॅंकरच्याच पाण्यावर जगत आहेत. अलीकडच्या काळात त्याचे दुष्परिणाम आम्हाला जाणवत आहेत. त्वचा काळी पडणे, अंग खाजणे, टक्कल पडणे, अकाली केस पांढरे होणे, दात पिवळे पडणे यासह पोटाचे अनेक विकार सुरू झाले आहेत. गुरुवारची ‘लोकमत’ची बातमी अन् फोटो पाहिल्यावर कळाले की पिण्याचे पाणी असे टॅंकरवर लिहिलेले असले तरी आत पाणी पिण्याचे नसते. सर्रासपणे प्रक्रिया न केलेले पाणी पुरवले जात असून, हे विदारक आहे.
- मनिषा लुकडे, नागरिक, धानोरी
महापालिकेची जलवाहिनी क्वचित ठिकाणीच अंडरग्राउंड आहे. इतर ठिकाणी ती जमिनीच्या वरून आहे. त्यामुळे ती फोडून विहिरीपर्यंत पाइपलाइन केली असेल तर ते लगेच उघड होईल. कॅनॉल फोडल्याची चर्चा असेल तर त्याबाबत ज्यांच्या विरोधात तक्रार येईल किंवा माहिती मिळेल, त्या विहिरीचे पाणी आणि त्या पाण्याचे स्रोत महापालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने तपासले जातील.
- नंदकिशाेर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका