तळेगाव ढमढेरे : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भामा आसखेडचे पाणी भीमा नदीमध्ये १२ दिवसांपासून सोडण्यात आले असून दौंड तालुक्यातील तीन बंधारे भरले आहेत, तर चार बंधारे कोरडे आहेत. हे भरल्यानंतरच पाणी बंद करण्यात येईल, असे कोंढापूर पाटबंधारे शाखाधिकारी जे. डी. संकपाळ यांनी सांगितले. कोंढापुरी पाटबंधारेचे शाखाधिकारी जे. डी. संकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकासाठी व पिण्यासाठी २८ मार्चपासून भामा-आसखेड धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव, सादलगाव व कानगाव हे तीन बंधारे भरले असून सोनवडी, खोरवडी, देऊळगावराजे व पेडगाव हे चार बंधारे कोरडे आहेत. ९०० घनफूट प्रतिसेकंदाने हे पाणी सोडण्यात आलेले आहे. साधारण पाच दिवसांमध्ये हे बंधारे भरतील. पाणी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संकपाळ यांनी सांगितले, शिरूर तालुक्यातील राज्य विद्युत मंडळाच्या कोरेगाव भीमाचे शाखाधिकारी चंद्रशेखर महाजन यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडित न केल्यामुळे शेतकऱ्यांनी महाजन यांच्यावर कार्यवाही करावी, याबाबत पाटबंधारे खाते व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, असे संकपाळ यांनी सांगितले. आज केलेल्या नोंदीनुसार भामा-आसखेड धरणात पाणीसाठा ४०.८५ टक्के शिल्लक आहे. सध्या दुसरे आवर्तन सुरू असून गरज भासल्यास तिसरे आवर्तन सोडणार आहे. (वार्ताहर)
तलाव भरल्यानंतरच पाणी बंद
By admin | Published: April 09, 2016 1:48 AM