आळेफाटा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची सप्टेंबर २०१५ पर्यंतची थकबाकी दिलेल्या मुदतीत संबंधित ग्रामपंचायतींनी न भरल्याने आज रविवारपासून (दि. ३१) या गावांमधील पाणीपुरवठा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने बंद करण्यात आला आहे.बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पूर्व भागातील खामुंडी, उंब्रज, पिंपरीपेंढार, वडगाव आनंद, आळेफाटा, आळे, राजुरी, बेल्हे, गुळुंचवाडी पठार भागातील आणे या गावांना १९९७ पासून येडगाव धरणातून पाणी जलवाहिनीद्वारे खामुंडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून तेथून पाणीपुरवठा केला जात आहे.दरम्यान, या गावांमधील पाणीपुरवठा योजनेची सप्टेंबर २०१५ पर्यंतची थकबाकी एक कोटी ३५ लाख रुपये आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यू. बी. करंजकर यांनी सांगितले की, ही थकबाकी ३० जानेवारीपर्यंत भरण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा देण्यात आल्या होत्या; मात्र दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्याने नाईलाजाने पाणीपुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनी थकीत रकमेच्या २५ ते ५० टक्के रकमेचे धनादेश दिल्यास पाणीपरवठा त्वरित सुरूकरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र वसुलीबाबत ग्रामपंचायती अडचणीत असून दुष्काळग्रस्त गावे असल्याने व पर्याय उपलब्ध नसल्याने मानवतेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी केली आहे. (वार्ताहर)
बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी बंद
By admin | Published: February 01, 2016 12:39 AM