भोर : भाटघर धरणातीलपाणीसाठा कमी झाल्यामुळे उद्यापासून (दि. १३) मेपासून भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची महिती मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी दिली.
भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला भोर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. धरणाच्या भिंतीपासून चारी खोदून विहिरीत पाणी घेतलेले आहे. मात्र धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा असल्यामुळे चारीतून पाहिजे त्या प्रमाणात पाणी विहिरीत येत नाही. शिवाय धरणावरील वीजनिर्मिती केंद्रही बंद आहे.त्यामुळे विहिरीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भोर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमता असलेल्या दोन मोटारी आहेत. मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फक्त ६० एचपीची मोटारच सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भोर शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, भोर शहरातील लोकांना चांगले स्वच्छ पाणी मिळावे यासाठी दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे. अशा आशयाचे निवेदन नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले असून, शहरातून दवंडी पिटविण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी मे महिन्यात धरणातील पाणीसाठा कमी झाला की भोर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळे दिवासाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे .मात्र भोर, नगरपलिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भोर नगरपलिकेकडून पाटबंधारे विभागाला भाटघर धरणातील पाण्यासाठी सुमारे २५ लाख रुपये पाणीपट्टी दरवर्षी दिली जाते. मात्र नगरपलिकेकडून तीन लाख रुपये पाणीपट्टी थकलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणीपट्टी नगरपलिकेकडून दिली जाते; मात्र दर मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवते यामुळे भोर शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत
नियोजनाच्या अभावामुळे ओढवले संकट
भोर शहराला भाटघर धरणाखाली विहीर काढली असून, पावर हाऊसमधून बाहेर पडणारे पाणी त्या विहिरीत जाते आणि भोर शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावर हाऊस बंद झाल्याने धरणातील पाणी बाहेर पडत नाही. केवळ धरणातून लिक होणारे थोडेफार पाणी नगरपालिकेने चारी काढून विहिरीत सोडले आहे, मात्र हे पाणी पुरेसे नाही. धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाही नगरपलिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे यामुळे ऐन उन्हाळ्यात भोर शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत.