पुणे : पावसाने ओढ दिल्याने आणि धरणांतीलपाणीसाठा कमी झाल्याने पुणेकरांवरपाणीकपातीचे संकट ओढवले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतला. पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने शहरात सोमवारपासून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करून सोमवारपासून अंमलबजावणी करावी, अशी चर्चा बैठकीत झाली आहे.
पुण्यात सध्या सर्व भागांमध्ये समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. बऱ्याच भागांमध्ये कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी येते. शहरातील सर्व नागरिकांना समान पाणी मिळावे, यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाही पाणीकपात करण्याचा निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करणे सुरू केले आहे.
पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे संकट आणखीनच गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सतर्क झाली असून, दोन दिवसांपूर्वी महापालिका अधिकाऱ्यांनी वेधशाळेत जाऊन आगामी काळातील पावसाचा अंदाज घेतला. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा अंदाज वेधशाळेने तसेच स्कायमेटने दिला असला तरी जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये जेमतेम २.७६ टीएमसी पाणीसाठा आहे.
मागील काही वर्षांचा अनुभव पाहता पाटबंधारे विभागाकडून १५ जुलैपर्यंत पुणे शहराच्या पाण्याचे नियोजन केले जाते. गेली पाच वर्षे जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणीकपातीचे संकट दूर राहिले. यंदा मात्र परिस्थिती अधिकच बिघडली आहे. जून महिन्यात २३ तारखेपासून चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. चार दिवस होत आले तरी पावसाचा पत्ता नसल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. पुण्याकडे व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. पाऊस लांबणीवर पडल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांची बेठक झाल्यावर निर्णय घेण्यात आला आहे.
धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे, त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. सोमवारपासून पुण्यात पाणीकपात लागू होईल. त्याचे वेळापत्रक व इतर निर्णय शुक्रवारी अंतिम केले जाईल. पाऊस लांबणीवर पडल्याने महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागत आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका