ओझर : अवेळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे विविध रोगाशी सामना करीत कसेबसे कांदापिक वाचवले. मात्र, आता निकृष्ठ बियानांमुळे बहुतांश ठिकाणी कांदा पिकाला डेंगळे आली आहेत. त्यामुळे नगदी कांदा पिकाचा हंगाम वाया गेला आहे. भांडवली खर्चासाठी कर्ज काढून कांद्याचे पीक घेतले; परंतु डेंगळांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ६२९४ हेक्टरवर कांद्याची लागवड असून येथील शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांची पुढची युवा पिढी शेती व्यवसायात पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिकीकरणाची कास धरून मोठ्या उमेदीने शेती व्यवसायात उतरली आहे. कांदे बियाणे टाकण्याच्या काळात बियाणांचा प्रचंड तुटवडा निर्माण यामुळे कांदाउत्पादकांनी इतर शेतकऱ्यांकडून तसेच दुकानांमधून चढ्या दराने कांदा बी घेतले. मात्र याची गुणवत्ता तपासली नाही. त्यामुळे हे निकृष्ट बी टाकल्यामुळे त्यांना आता डेंगळाचा समाना करावा लागत आहे. नगदी पीक म्हणून कांदापिकावर शेतकऱ्याचे बारमाही प्रापंचिक अर्थकारण अवलंबून असते. डेंगळ्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते या वर्षी कोलमडणार आहेत. डेंगळा समस्यामुळे निकृष्ट बियाणांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, निकृष्ट बियाणांचा पुरवठा करणाऱ्या खासगी शेतकरी तसेच कंपन्यांवर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून पुढे येत आहे. डेंगळे आलेल्या तालुक्यातील सर्व कांद्याच्या प्लॉटची पाहणी करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांनी सांगितले.(वार्ताहर)
कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी
By admin | Published: February 27, 2015 6:00 AM