बाभूळगाव (पुणे) :सोलापूर शहराची तहान भागवण्यासाठी तसेच भीमा नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून १९ मार्चला पाणी सोडले असल्याची माहिती उजनी धरणाच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. भीमा नदीत किमान ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
उजनी धरणात सध्या ९१.९७ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, उजनी धरण सध्या ५२.८५ टक्के भरले आहे. सोलापूर, पंढरपूर व इतर भागात पिण्याच्या पाण्याची मागणी होत असल्याने धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या पाण्यामुळे नदीवर असलेल्या १५० पाणीपुरवठा योजनांनाही लाभ होणार आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात हे पाणी पोहोचल्यानंतर उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली.