पुणे : शेतकऱ्यांना पाणी देणारे सरकार सत्तेवर येईल का, हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. शेतकºयांनी स्वत:च प्रयत्न करुन पाणी कमवून संवर्धन करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर अशी वेळ येणे हे दुर्दैवी आहे. कारण, सरकारने विविध योजनांमधून पाण्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. मात्र, पाणी व्यवस्थित अडवले जात नाही. जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापनाचे तंत्र समजून न घेतल्यास भविष्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे देशाची हानी होऊ शकते, असे संमेलनाध्यक्ष मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने २० मार्च ते २२ मार्च या कालावधीत तीन दिवसीय जलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जलोत्सवाचे उदघाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रांतपाल अभय गाडगीळ, प्रकल्प संचालक सतीश खाडे, जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे, प्रदीप पुरंदरे आदी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘पाण्याचा प्रश्न भारत विरुद्ध इंडिया असा निर्माण झाला आहे. शहरात पाणी सहज आणि कमी दरात उपलब्ध होते. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी गरिबांना पायपीट करावी लागते. या क्षेत्रातही राजकारण रंगत असल्याने पाण्याचा प्रश्न हा गरिबीचा प्रश्न बनला आहे. प्रत्येक शहरी माणसाने आपले पाणी स्वत: कमवावे, वाचवावे, संवर्धन करावे, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर द्यावा. नागरिकीकरण झपाट्याने वाढत असताना पाणीरुपी संपत्तीचे वाटप समन्यायी असावे. मात्र, बरेचदा पाण्याचे समान वाटप होत नाही आणि तो राजकीय प्रश्न बनतो.’‘औद्योगिक क्षेत्राने पाण्याच्या पुनर्वापर करावा. कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडण्यावर सरकारने निर्बंध घालावेत, असे न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी. पाण्याशी निगडीत प्रयोग निष्पक्षपणे तपासून मोडीत न काढता प्रचार आणि प्रसार करावा. ती निर्दोष करण्यासाठी प्रयत्न करावेत, पाण्याचे स्रोत प्रदूषणविरहित ठेवून वृद्धिंगत करावे, असा मौैलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला. अभय गाडगीळ म्हणाले, ‘पाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्याचा प्रश्न अभ्यासातून मांडणे गरजेचे आहे. पुण्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाडा, विदर्भात जाऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.’‘साहेबराव करपे यांनी ३२ वर्षापूर्वी सामूहिक आत्महत्या केली. त्यानंतर आजवर शेतकरी मोर्चे, आंदोलने झाली. पण, शेतक-यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने आजवर ठोस उपाययोजना मिळाली नाही, हे दुर्दैव. अंधश्रद्धा केवळ धार्मिक नसते, जलक्षेत्रात आधुनिक अंधश्रद्धाचे पेव फुटत आहे’, याकडे उपेंद्र धोंडे यांनी लक्ष वेधले. सतीश खाडे यांनी प्रास्ताविक केले. कोटजन्म-पुनर्जन्म, बदल, प्रेरणा आणि नवनिर्मिती अशा विविध माध्यमातून पाण्याचा प्रश्न जागतिक साहित्यामध्ये मांडला आहे. मात्र, सध्याचा प्रश्न फारसा गांभीर्याने हाताळण्यात आलेला नाही. मराठी साहित्यामध्ये पाणी आणि टंचाई असे समीकरण बनले आहे. ग्रामीण साहित्यिकांनी पाण्याचा प्रश्नाचे वास्तव साहित्यातून मांडले आहे. ‘पाणी पाणी’ हे माझे पुस्तक कालबाह्य व्हावे, अशीच लेखक म्हणून माझी इच्छा आहे. वास्तवाचा स्वीकार करून, व्यापकता समजून घेऊन ते बदलण्यासाठी प्रयत्न व्हावेत. - लक्ष्मीकांत देशमुख
पाणी देणारे सरकार सत्तेवर येईल का? : लक्ष्मीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 7:20 PM
शहरात पाणी सहज आणि कमी दरात उपलब्ध होते. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी गरिबांना पायपीट करावी लागते. या क्षेत्रातही राजकारण रंगत असल्याने पाण्याचा प्रश्न हा गरिबीचा प्रश्न बनला आहे.
ठळक मुद्दे शहरात पाणी सहज आणि कमी दरात उपलब्ध औद्योगिक क्षेत्राने पाण्याच्या पुनर्वापर करावा