पुणे : उन्हाळा असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येते. पण जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेसमोर जलवाहिनी फुटल्याने त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे स्वच्छ पिण्याचे पाणी असून, त्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.
या गळती संदर्भात स्थानिकांनी पाणीपुरवठा विभागाला माहिती दिली. पण एक महिना झाला तरी येथील गळती रोखण्यात आलेली नाही. जंगली महाराज रस्त्यालगत स्मार्ट सिटी अंतर्गत कामे करण्यात आली आहेत. पादचारी मार्गांचे सुशोभीकरण केलेले आहे. त्या सुशोभीकरणातच एका ठिकाणी जलवाहिनी फुटलेली आहे. त्यातून हे पाणी थेट ड्रेनेजमध्ये जात आहे. तसेच रस्त्यावरही येते. स्मार्ट सिटीचे काम असल्याने तिथे कोणालाही खोदकाम करता येत नाही. त्यासाठी परवानगी घेऊनच दुरूस्ती करावी लागणार आहे. एक महिना झाला तरी दुरूस्तीसाठी महापालिकेला वेळ मिळालेला नाही.