जेजुरी : जेजुरी शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा वीर जलाशयातूनच होऊ शकतो. या जलाशयातून पाणी आणण्याचा प्रस्ताव पालिकेकडून देण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह आज वीर जलाशयावर जाऊन जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी सध्या नाझरे जलाशय आणि नीरा नदीवरील मांडकी डोहातून पाणीपुरवठा होत आहे; मात्र या दोन्ही योजनांतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नेहमीच नियोजन करावे लागते. शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने तीर्थक्षेत्राचे ठिकाण असूनही पाण्याचा प्रश्न नेहमीच गंभीर राहतो. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. याबाबत पालिकेत नागरिकांच्या सततच्या तक्रारी व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. पालिकेने यासाठी थेट वीर जलाशयातून जेजुरीसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वीर जलाशयावरून सुमारे २५ किमी लांबीची पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन्स बदलणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी साधारणपणे ३० ते ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता डी. एन. विजापूरकर आणि डी. एल. अंधारे यांच्यासह मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा सौ. सोनाली मोरे, माजी नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई यांनी वीर जलाशयावर जाऊन योजनेसाठी ज्या ठिकाणी जॅकवेल उभारण्यात येणार आहे. (वार्ताहर)
वीर जलाशयातून जेजुरीला पाणी
By admin | Published: January 09, 2016 1:38 AM