पाणी प्रयोगशाळा पुण्याच्या वैभवात भर घालणारी असेल: उपमुख्यमंत्री अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:59+5:302021-02-06T11:10:56+5:30
पुणे : पाणी म्हणजेच जीवन. ते देताना नागरिकांच्या आरोग्याच्या विचार करायला हवा. पुण्यात होणारी ही पाणी तपासणी प्रयोगशाळा हे ...
पुणे : पाणी म्हणजेच जीवन. ते देताना नागरिकांच्या आरोग्याच्या विचार करायला हवा. पुण्यात होणारी ही पाणी तपासणी प्रयोगशाळा हे काम प्राधान्याने करून पुण्याच्या वैभवात भर घालेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
वडगाव बुद्रुकमध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री डॉ. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
ही प्रयोगशाळा उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. इमारत बांधताना दर्जा, गुणवत्ता यांचा विचार करूनच उभारणी करण्याची सूचना पवार यांनी केली. गुलाबराव पाटील म्हणाले, पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. ते शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहे. प्रयोगशाळा त्यासाठीच आहे.
पवार यांनी पाणी गुणवत्ता तपासणी प्रात्यक्षिकाची तसेच सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रास्तविक केले. अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या मुख्यालयातील भूजल जागृती प्रदर्शनाच्या नव्या कक्षाचे उद्घाटन केले. पाण्याचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेऊन भूजल व्यवस्थापनासाठी नागरिकांमध्ये आतापासूनच जागृती निर्माण करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भूजलचे संशोधन व विकास विभागाचे उपसंचालक डॉ. विजय पाखमोडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रदर्शनातील या नव्या कक्षाची रचना केली व कार्यक्रमाचे संयोजन केले.