पुणे : जून महिन्याचा पंधरवडा उलटायला काही दिवस बाकी असताना पावसाच्या अभावी पुणे शहरावर पाणीकपातीचे ढग जमा होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहेत.पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जून महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची आवक होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पाणीसाठा वाढायला वेग येतो. यंदा मात्र जूनच्या ८ तारखेपासून पुणे जिल्ह्यावर मान्सून बरसणार असल्याची शक्यताही हवेत विरली आहे. अर्थात याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत असून आहे.त्यामुळे शहराला पाणीकपात करावी लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्दैवाने पाऊस अंदाजापेक्षा कमी झाल्यास किंवा उशिरा झाल्यास पुणे शहरात पाणी कपात करावी लागेल यात शंका नाही.
दर महिन्याला सुमारे सव्वा ते दीड टीएमसीच्या दरम्यान पाणी पुणे शहराकडून खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर धरणातून वापरले जाते. या खडकवासला धरण साखळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणातून पुणे शहराला पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. यातील टेमघरची क्षमता ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. यंदा एकूण पाणीसाठ्याच्या केवळ १२.२०टक्के पाणी शिल्लक असून ते ३.५५टीएमसी इतके आहे. यावर तात्काळ उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने येत्या दोन दिवसात अर्थात १५ जूनपासून शेतीच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा मात्र राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.