लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : उजनी जलाशयातून येत्या एक जूनपासून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने देणे आणि त्यांचे नूतनीकरण सुरू होणार असल्याची माहिती भीमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सोनेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.१९९५मध्ये दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयातून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने काढून आपली कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणली. या पाणी परवानगीची १८ वर्षांची मुदत २०१३मध्ये संपली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी या विभागाकडे हे पाणी परवाने नूतनीकरणासाठी मागणी केलेली आहे. परंतु, दीड-दोन वर्षांपासून नवीन पाणी परवाने आणि नूतनीकरणाचे काम बंद आहे. भीमानगर उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सोनेवार यांनी सांगितले, की दीड-दोन वर्षांपासून नव्हे, तर दीड-दोन महिन्यांपासून पाणी परवानगी नूतनीकरण बंद होते. ते १ जूनपासून सुरू होईल. जलाशयातील पाण्याचा जो आपल्याला अपेक्षित वापर दिलेला आहे त्यापेक्षा जास्त वापर होता. अपेक्षित ९.६ टीएमसी असणारा वापर १२ टीएमसीपर्यंत गेलेला होता. त्यामुळे पाणीवापरावर नियंत्रण आणण्यास सगळ्यांना सांगितले होते.दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर, पेडगाव, वडगाव दरेकर, देऊळगावराजे आणि आलेगाव या ११ गावांतील शेतकऱ्यांना उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्यावर शेती सिंचनाखाली आणलेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना हे पाणी उचलण्यासाठी उजनी धरणाच्या पाणी परवानगी काढाव्या लागतात. या परवानग्या काढण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. दौंड आणि भिगवण या शाखांतून अनेक शेतकऱ्यांनी दीड-दोन वर्षंापासून प्रकरणे पाठविण्यात आली आहेत; परंतु प्रकरणाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ही प्रकरणे उजनी पाणी व्यवस्थापन, भीमानगर येथे पडून आहेत. त्या ठिकाणी पाणी परवानगीची चौकशी केली, तर तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळतात. दौंड आणि भिगवण शाखा कार्यालयात याबाबत विचारले असता ‘भीमानगरला चौकशी करा,’ असे सांगितले जाते. जर शेतकऱ्यांना पाणी परवानगी देण्याचे बंद केले असेल, तर ही प्रकरणे जमा का करून घेतली? पैसे भरून का घेतले? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
उजनीतून १ जूनपासून पाणी परवाने
By admin | Published: May 26, 2017 5:45 AM