लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ११ आणि २३ गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याविषयी बुधवारी महापालिकेच्या मुख्य सभेत चर्चा करण्यात आली. यासाठी महापालिकेकडून राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला प्रस्ताव पाठविण्याचा ठराव सभेने मंजूर केला.
पुणे महापालिका हद्द वाढल्याने आणि विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहराची पाण्याची गरज वाढली आहे. त्यातच महापालिका हद्दीत नव्याने ११ आणि २३ गावांचा समावेश झाल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. वाढीव पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुळशी धरणातून पाणी घेण्याचा पर्याय भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्यानुसार बुधवारी झालेल्या मुख्य सभेत महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ११ आणि २३ गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाला प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी देण्यात आली.
यावेळी बोलताना काँग्रेस गटनेते आबा बागुल म्हणाले, शहराला मुळशी धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उचलून धरली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, हा प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर होणार आहे. मुळशी धरणाचे पाणी शहराला मिळण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायमच केल्या आहेत. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे शहराला आज भामा आसखेड धरणाचे पाणी मिळाले आहे. याबद्दल मी पुणेकरांच्यावतीने अजितदादांचे धन्यवाद मानतो. बाबुराव चांदेरे म्हणाले, पुणे शहराच्या पाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, पालकमंत्री म्हणून अजित पवार कायमच चोख भूमिका बजावतात, यात कोणतेही दुमत नाही. आज आपण सभागृहात प्रस्ताव मंजूर करू, यानंतर आपण सर्वांनी मिळून शासनाकडे पाठपुरावा केला तर या धरणातून आपल्याला पाणी मिळेल. देवेंद्र फडणवीस असोत किंवा अजित पवार या दोघांनीही पुण्याला झुकते माप दिले आहे.