लोणावळा : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील नांगरगाव जाधव कॉलनी येथे पाण्याचा विळखा पडल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. लोणावळा परिसरात काल बुधवार पासून पावसाची संततधार सुरु आहे. बुधवारी रात्रभर शहरात जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मागील चोवीस तासात शहरात 301 मिमी (11.85 इंच) पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी शहरात आतापर्यत 1853 मिमी पाऊस झाला असून तो मागील वर्षीच्या सरासरी पेक्षा जास्त आहे. जोरदार पावसामुळे जाधव कॉलनीत अनेक घरामध्ये पाणी घुसले असून रस्ते व मोकळ्या जागांना ओढ्या नाल्याचे स्वरुप आले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे योग्य पध्दतीने झाली नाहीत तसेच अनेक भागात गटारीच गायब झाल्याने रस्त्यावरुन पाणी वाहताना दिसत आहे. रायवुड येथील ट्रायोज मॉल समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बापदेव रोड जलमय झाला आहे. नांगरगाव रस्त्याच्या लगत गटारी नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी न काढल्याने ती नांगरगाव येथील सुरैय्या पुलाला येऊन आडकली आहे. यामुळे नांगरगाव ते भांगरवाडी या रस्त्यावर जागोजागी पाणी तुंबले आहे. नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनधी यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
लोणावळ्याजवळील नांगरगावला पाण्याचा विळखा, २४ तासांत ३०१ मिमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:56 PM