चाकण (पुणे) :चाकण परिसरात परतीच्या पावसाने काल रात्री अक्षरशः धुमाकूळ घातला. चाकण शहरासह आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढेल. यामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते.
वाढत्या ऑक्टोबर हिटमुळे मागील तीन-चार दिवसांपासून वातावरणात गरमी मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. त्याचप्रमाणे, काल (१७) साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने मुसळधार सुरुवात केल्याने, चाकण व परिसरातील शेतकरी, कामगार आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. तास दोन तासांत पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाने पुणे-नाशिक महामार्गावरील मेदनकरवाडी भागातील बंगला वस्तीजवळ रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने चारचाकीसह दुचाकीस्वारांना मार्ग काढणे जिकरीचे झाले होते. यामुळे महामार्गावर रात्रीपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बंगला वस्तीजवळ साठलेले पाणी काढून देण्यासाठी मेदनकरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अमोल साळवी, संदेश साळवी, विद्यमान सदस्य महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, डॉ.विजय मेदनकर, तसेच चाकण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर चौरे यांच्यासह तब्बल पंचवीस पोलिसांच्या ताफ्याने तीन जेसीबी मशीनच्या मदतीने बुजलेल्या गटारी उघड्या करून पाण्याचा निचरा करून देण्यात आला. पाणी काढून देण्याचे काम सुरू असताना, रस्त्यावर दोन्ही बाजूला दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडीचा फटका औद्योगिक वसाहतीत कामांवर जाणाऱ्या पहिल्या पाळीतील कामगारांसह अधिकाऱ्यांना ही बसला.