पुणे : शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये सध्या पुनर्विकासाचे काम सुरू असून या कामादरम्यान वारंवार जलवाहिनी तुटण्याच्या घटना घडत आहेत. बांधकाम व्यावसायिकाच्या अवजड वाहनांमुळे वारंवार पाण्याची गळती होत असून शुक्रवारी सकाळी पुन्हा जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. मुळातच कमी दाबाने पाणी येत असल्याने हैराण असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांच्या अडचणीत भर पडली आहे. पोलिसांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, वसाहतीमध्ये दोन दिवसांपासून अर्धा तास पाणी येत आहे. जलवाहिनी जुनी झाल्याने कमी दाबाने पाणी येते. मुळातच पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अनियमित होत आहे. त्यातच अशा घडू लागल्याने पोलिसानी ड्युटी वर जायचे का पाणी भरायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून जलवाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली आहे. शिवाजी नगर पोलीस वसाहतीमध्ये पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सतावत आहे. येथे राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी अनेकदा पाण्यासाठी आंदोलन केले आहे. मात्र, प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. येथील पोलिसांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले आहे. या कामासाठी सध्या जेसीबी व तत्सम अवजड वाहनांच्या आधारे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यापासून वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत आहेत. सध्या पुण्यात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जलसंपदा आणि महापालिकेमध्ये पाण्यावरून वाद सुरू आहेत. त्यातच पाण्याची अशी नासाडी होउ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये जलवाहिनी फुटली : पोलिसांच्या कुटुंबियांकडून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:06 PM
शिवाजी नगर पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी अनेकदा पाण्यासाठी आंदोलन केले आहे..
ठळक मुद्देवसाहत पुनर्निर्माण कामादरम्यान वारंवार घटना