कांताराम भवारी, डिंभेवाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सध्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील पाणवठे आटू लागल्याने दरवर्षी शिमग्यात भासणारी पाणीटंचाई यंदा महिनाभर आधीच जाणवू लागली आहे. धरण पाणलोटक्षेत्रात तर खोल-खोल गेलेले पाणी महिलांना डोक्यावर वाहून आणावे लागत असल्याने दमछाक होत आहे. डोंगरदऱ्यांतील पाण्याचे स्रोत आटू लागल्याने रणरणत्या उन्हात डोक्यावर हांडे घेऊन पायाखालचा फुफाटा तुडवत घोटभर पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट सुरू झाली आहे. डोंगरमाथ्यावरील आहुपे खोऱ्यातील कोंढरे, न्हावेड, नाणवडे, आघाणे, तिरपाड, पिंपरगणे, डोणी, कापरवाडी, भोईरवाडी तर बोरघरच्या उंबरवाडी, काळवाडी या डोंगर माथ्यावरील आदिवासी वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाणवठे आटू लागले असून, धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीही झपाट्याने कमी होऊ लागले आहे. माणसांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचेही हाल होऊ लागले आहेत. आधीच चाराटंचाई त्यात पिण्याच्या पाण्याचेही हाल होऊ लागल्याने यंदा पाळीव जनावरेही सांभाळताना आदिवासी शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. एकंदरीतच पावसाने या भागातून लवकर घेतलेला काढता पाय, स्थानिक पाणवठे आटल्याने निर्माण होऊ लागलेली पाणीटंचाई, तर डिंभे धरणातील दिवसेंदिवस घटत जाणारी पाणीपातळी यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदाचा उन्हाळा अधिकच कडक जाणार यात शंका नाही.> महिनाभर आधीच स्रोत आटू लागल्याचे चित्रआंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागात यंदा पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. यंदा पावसाने या भागातून लवकरच काढता पाया घेतल्याने दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांजवळील पाण्याचे नैसर्गिक स्रोेत यंदा महिनाभर आधीच आटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. > विहिरींनी तळ गाठलेगावांच्या आसपास बांधण्यात आलेली तळी आटू लागली असून, शिल्लक राहिलेले पाणी दूषित होऊ लागले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. डिंभे धरणाच्या आत घोडनदीवर बांधण्यात आलेले बंधारे तर कोरडे ठणठणीत पडले आहेत. अडिवरे व कोकणेवाडी तसेच फुलवडे येथील बंधाऱ्यात जेमतेम पाणी आहे तेही दूषित होऊ लागल्याचे चित्र आहे.
पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट
By admin | Published: March 12, 2016 1:37 AM