पुणे : धानोरी येथील जकातनाका परिसरात पोरवाल रस्त्याच्या सुरुवातीला बुधवारी (दि. ३०) सायंकाळी चारच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याच्या दाबामुळे २ मजल्यांच्यापेक्षा जास्त उंचीवर सुमारे २० मिनिटे पाण्याचे कारंजे उडत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला.
ज्याठिकाणी जलवाहिनी फुटून पाण्याचे कारंजे उडत होते, तेथे पाहणी केली असता जलवाहिनीचा 'एअर व्हॉल्व' निघाल्याचे दिसून आले. त्यानंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनी फुटून उडणाऱ्या कारंज्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात सुखद गारव्याचा अनुभव मिळाला. मात्र या घटनेमुळे पोरवाल रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत होते. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एअर व्हॉल्व्ह निघाल्याची शक्यता आहे. आपण स्वतः घटनास्थळी थांबून कर्मचाऱ्यांकडून तत्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करून घेतल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता नरेश रायकर यांनी दिली. माेठ्या प्रमाणावर पाण्याचे कारंजे उडत असल्याने लहान मुलांनी मनसाेक्त भिजण्याचा अानंद लुटला. पाईपलाईन फुटल्याचे समजताच बघ्यांची माेठ्याप्रमाणावर गर्दी झाली हाेती. येथील दुकानदारांनी पाण्याच्या बादल्या भरुन घेतल्या.
दरम्यान धानाेरीतील काही भागात पाणी टंचाईमुळे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत अाहे. त्यात 20 मिनिटांंहून अधिक काळ पाणी वाया गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.