पिंपरी : पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी महिलावर्ग आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात ३७ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच दिवशी २६ टक्के पाणीसाठा होता. वाढलेली लोकसंख्या व पाणीउपसा लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पाऊस होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे, त्यामुळे महापौरांनी गटनेते, पक्षनेते आणि प्रशासनाची बैठक घेऊन पाणी कपातीचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. शहराचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यापैकी मंगळवारी एका विभागात पाणीपुरवठा करण्यात आला. उद्या दुसऱ्या विभागात पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियमितपणे होणाऱ्या पाण्यात २५ टक्के कपात करण्यात येत आहे. चिंचवड, निगडी, सांगवीच्या काही भागांत नियोजित वेळेत पाणीपुरवठा झाला नाही. तसेच काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. (प्रतिनिधी)पाऊस लांबल्यास कपात वाढविणारपाऊस येण्यास उशीर झाला, तर आढावा बैठक घेऊन कपातीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये भरारी पथक नेमण्यात येत आहे. तसेच पाण्याचा गैरवापर, अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.प्रबोधनाकडे केले दुर्लक्षपाणीपुरवठा विभागाने महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. याबाबतची माहिती प्रभाग स्तरांवरून नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत दवंडी पीटविणे किंवा पत्रकाद्वारे माहिती देणे गरजेचे होते. पहिल्याच दिवशी वेळापत्रक शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना न कळाल्याने तारांबळ उडाली होती. ‘‘बिले न भरणाऱ्यांवर नळजोड तोडण्याची कारवाई पाणीपुरवठा विभाग करते, यासाठी प्रबोधन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पाणी कपातीची माहिती मिळाली नाही. याबाबत नाराजी व्यक्त केली.
पाणी नियोजन कोलमडले
By admin | Published: May 03, 2017 2:36 AM