वडाची वाडीत वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची समस्या तीव्र
........................................
महिलांची हंडाभर पाण्यासाठी वणवण; महापालिकेला घालणार साकडे
........................................
दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या परिघावरील वडाची वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असुन वाढत्या उन्हाबरोबर दाहकता वाढत चालली आहे.
आजूबाजूला वेगाने वाढत असलेले नागरिकरण आणि त्या तुलनेत सुविधांचा अभाव, यामुळे विलिनीकरणाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
गावात सर्वात महत्त्वाचा आणि जाचक प्रश्न हा पिण्याच्या पाण्याचा आहे. गावासाठी महापालिकेची लाईन नसल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दोन विहीरी आणि ''वडाची वाडी पाझर तलाव'' आहेत. परंतु आता गावातील वाढते नागरिकरण पाहता हे पाणी अपूरे पडत आहे. जे तुरळक पाणी मिळते तेही अशुद्ध आणि महागडे असून आता आम्हाला महापालिकेने पाणी उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
गावात ७० % भागात भूमिगत गटारचे काम झालेले असून औताडेवाडीजवळील परिसर आणि काही प्लॉटिंगच्या भागातील उर्वरित काम जलदगतीने सुरु आहे. सांडपाण्याची व्यवस्था ही महापालिकेच्या लाईनला जोडली असल्याने ग्रामस्थांना सांडपाण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे.
गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा आहे. ३/४ छोट्या मोठ्या टेम्पोमार्फत हा कचरा मंतरवाडी कचरा डेपोत टाकला जातो आहे. गावाला मोठे गायरान असूनही आमच्या गावात कचरा डेपो का नाही, असा प्रश्न गावकरी विचारतात.
गावातील मुख्य रस्त्याचे काम स्थानिक आमदार निधीतून सुरू आहे. त्याचबरोबर गावातील इतर अंतर्गत रस्त्यांची कामेही झालेली आहे. मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) निधी मिळाला नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली.
अन्य गावांना ही मदत मिळत असताना आम्हाला वंचित ठेवल्याने अन्य पायाभुत सुविधांना खीळ बसली, अशी तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी करतात.
____________________________________
*कोट*
कोरोनाकाळात ग्रामपंचायतील अपेक्षित निधी मिळाला नाही. यापुढे तरी भेदभाव नको. महापालिका पायाभूत सुविधांची व्यवस्था करत असेल तर आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.
-कांचन बांदल
सरपंच
____________________________________
याआधी जी अकरा गावं महापालिकेत समाविष्ट करण्यात आली त्यांचा पायाभूत सुविधांचा विकास झाला का? तर नाही, मग आमच्या गावाचा समावेश करुन फक्त राजकीय उद्देश साधला जाईल.
-रोहीत जाधव, युवक
_________________________
फोटो ओळ :
गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.