वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथील सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील १५ दिवसांपासून कळंबला पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे घोटभर पाणी मिळविण्यासाठी महिला धडपडत आहेत. येत्या चार दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास पंचायत समितीवर महिलांचा हंडामोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा कळंबच्या सरपंच शोभा पाटील यांनी दिलेला आहे. कळंब हे २५ हजार लोकसंख्या असणारे तालुक्याच्या पश्चिमेकडील सर्वात मोठे गाव म्हणून समजले जाते. या गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एकच सार्वजनिक विहीर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या विहिरीने तळ गाठल्याने २५ हजार लोकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५ टँकरची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप एकही टँकर मिळालेले नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दोन विहिरीचा प्रस्ताव जिल्हा परिषेदेकडे देण्यात आला आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधी शिल्लक असून पाण्यासाठी त्या पैशाचा वापर केल्यास कायमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री पेयजल योजना प्रस्ताव पाठवला असून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इंधन विहिर घेण्यात आली आहे. जर विहिरी प्रस्ताव त्वरित मंजूर केल्यास व १४ वित्त आयोगाचा पैसा पाण्यासाठी खर्च करण्यास परवानगी दिल्यास २५ हजार ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
कळंब परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: April 24, 2017 4:32 AM