रेव्हेन्यू कॉलनीत मागील सात ते आठ वर्षांपासून नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मागील दोन वर्षांपासून हा पाणी प्रश्न फारच त्रासदायक ठरू लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी अर्ज, विनंत्या आणि प्रसंगी आंदोलने करूनही आम्हाला पाणी पुरवठा सुरळीतपणे झाला नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
कॉलनीत जुन्या घरांच्यावर बांधकाम झाली असून मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर शेजारी मॉडर्न महाविद्यालय असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी रेव्हेन्यू कॉलनीतील वेगवेगळ्या वसतिगृहात भाड्याने राहतात. त्यामुळे कॉलनीतील लोकसंख्या वाढली आहे.
रेव्हेन्यू कॉलनीत सेनापती बापट रोडवरील पाईपलाईनमार्फत पाणी पुरवठा होतो. तिथून जी लाईन येते त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आणि टेकडीवर ही कॉलनी असल्याने पाणी पुरवठा दाबाने होत नाही. म्हणून आता मनपाने एकतर पाईपलाईनचा आकार वाढवावा किंवा आम्हाला दररोज मुबलक पाणी पुरवठ्याची सोय करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील दोन वर्षांपासून आम्ही पाण्याचा टंचाईचा सामना करत आहोत. महापालिकेने आमच्या पाणीप्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. वेळोवेळी अर्ज, विनंत्या करूनही प्रश्न सुटलेला नाही. आता या प्रश्नावर कायमचा तोडगा काढायला हवा.
अरुण जोशी
ज्येष्ठ नागरिक, रेव्हेन्यू कॉलनी